सोलकढी

उन्हाळा वाढतो आहे म्हणून आज एक चांगली सहज करता येणारी सोलकढीची रेसिपी सांगतो.

सोलकढी, उन्हाळ्यात शरीराला चांगली. सोलकढीची कृती खालील प्रमाणे:

१ ओला नारळ खावून घ्यावा.
खोवलेल्या नारळाचे दुध काढावे. 
६ - ७ आमसुलं वाटीभर कोमट पाण्यात साधारण १ तास भिजत ठेवावीत. नंतर त्यातच ती पिळून त्यांचा रस काढावा.
या रसात नारळाचे दुध घालावे आणि चांगले मिक्स करून घ्यावे. यात चवी नुसार मीठ घालावे.

हि झाली सोलकढी तयार. आता तुम्ही हि सोलकढी आणखी खुमासदार करण्यासाठी यात थोडे आले ठेचून घालू शकता, वरून कोथिंबीर शिवरू शकता, सोलकढीत बारीक हिरव्या मिरचीचे तुकडे टाकू शकता. 

सोलकढी भाता बरोबर तसेच उन्हाळ्यात नुसती प्यायला पुन छान लागते.

मटण, चिकन, मच्छी बरोबर सोलकढी पचनास चांगली.

आमसुला ऐवजी कोकम आगळ वापरता आले तर सोलकढीची चव उत्तम लागते.

सोलकढीचे फायदे खालील प्रमाणे:
१. सोलकढी पचनास चांगली असून Appetizer म्हणून जेवणात चांगली.
२. यातील कोकम, त्वचा विकारावर (skin rashes) च्या उपचारासाठी वापरले जाते.
३. कोकम थंड प्रकृतीचे असून पित्तशामक म्हणून उपयुक्त.
३. ओल्या नारळाचे दुध पित्तशामक असून शरीरास थंड ठेवते.
४.  ओल्या नारळाचे दुध नैसर्गिक ताण नाशक आहे.


कॉर्न पिस खारा


लिमये यांचे खवय्या कट्‍टा - मु.पो. होटेल इंद्रप्रस्थ, मंचर

पुण्याहुन नाशिकला जातांना, मंचर ओलांडल्यावर डाव्या हाताला हा खवय्या कट्‍टा लागतो. स्वच्छ व सुंदर होटेल आहे. संध्याकाळी ४ नंतर पोचलात तर चाट मिळते. त्याआधी इतर खाण्याचे पदार्थ छान मिळतात.

इथल्या रेस्टॉरंट मध्ये एक हलकी फ़ुलकी डीश खुप छान मिळते - "कॉर्न पिस खारा"

पाक क्रुती (रेसिपी) एकदम सोप्पी:
हिरवे वाटाणे व स्वीट कॉर्न समप्रमाणात घ्यायचे. त्याला थोडे मक्याचे पिठ व मिठ लावायचे आणी डिप फ़्राय करायचे. मस्त कुरकुरीत होतात आणी छान लागतात.

बघा घरी एकदा प्रयत्न करुन...

टीप: लिमयेंनी मिसळ जरा जवळच राजगुरुनगरला किंवा नारायणगावला जाऊन खाउन यावी म्हणजे त्याना मिसळ कशी असावी ते कळेल. त्यांच्या मिसळमध्ये सुधारणा करायला अजुन बराच वाव आहे.

कोल्हापुरी मिसळ - Kolhapuri Misal Recipe

साहित्य:
१ वाटी मटकी, १ बटाटा, तळण्यासाठी तेल, १ कांदा, १ टोमॅटो, गरम मसाला, फरसाण, पोहे कुरमुर्याचा चिवडा, कोथिंबीर, लिंबू, ब्रेडचे स्लाईस किंवा पाव

कट बनवण्यासाठी साहित्य:
३-४ लसूण पाकळ्या, १ इंच आले, २-३ मिरी, १ लहान काडी दालचिनी, २-३ लवंगा, १ तमालपत्र, १ चमचा जिरेपूड, १ चमचा धनेपूड, अर्धी वाटी खवलेला ओला नारळ, १ मध्यम कांदा, २ मध्यम टोमॅटो, ४-५ लहान चमचे लाल तिखट, फोडणीसाठी तेल, आमसुल किंवा चिंच, मीठ

कृती:
१) मटकी १०-१२ तास कोमट पाण्यात भिजत घालावे. त्यात जर कडक मटकी आणि खडे असतील तर ते काढून टाकावे. सुती कपड्यात बांधून मोड काढावेत.
२) मटकीला मोड आले कि कट बनवून घ्यावा. त्याचवेळी मटकी कूकरमध्ये २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी.
३) कट बनवण्यासाठी लसूण पाकळ्या, आले, मिर्या, दालचिनी, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड,धनेपूड मिक्सरवर जेवढे बारीक होईल तेवढे बारीक करून घ्यावे.
४) कढईत ४-५ चमचे तेल गरम करावे. त्यात मिक्सरमधून काढलेला मसाला घालून खमंग परतावा. मसाल्याचा छान गंध सुटला कि त्यात १ कांद्याच्या आणि २ टोमॅटोच्या मोठ्या फोडी घालून परतत रहावे. सर्वात शेवटी खवलेला नारळ घालून परतावा. मिश्रणाला तेल सुटले आणि कांदा शिजला कि गॅस बंद करून बाजूला काढून थंड करावे. मिश्रण थंड झाले कि त्यात १ भांडे पाणी घालून मिक्सरवर पातळ पेस्ट करून घ्यावी.
५) नंतर मटकीची उसळ बनवून घ्यावी. पातेल्यात २-३ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून शिजवलेली मटकी घालावी. थोडे पाणी घालावे, १-२ चमचा गरम मसाला घालावा. बारीक गॅसवर उसळ उकळत असताना दुसर्या गॅसवर लहान कढईत अगदी थोडे बटाट्याचे तुकडे तळण्यापुरते तेल गरम करावे (साधारण अर्धी वाटी). (बटाटे तळल्यावर ७-८ चमचे तेल उरले कि त्यातच कट बनवता येतो.)
६) १ बटाटा सोलून त्याचे लहान चौकोनी तुकडे करावे, आणि मध्यम आचेवर बटाटे व्यवस्थित तळून घ्यावे, कच्चे राहू देऊ नये. तळलेले बटाट्याचे तुकडे उसळीत टाकावेत. चवीपुरते मिठ घालावे.
७) लहान कढई खालचा गॅस बारीक करून उरलेल्या तेलात हळद, हिंग, ४-५ चमचे लाल तिखट घालून तयार केलेली मसाल्याची पातळ पेस्ट घालावी. मीठ घालावे. आंबटपणासाठी २-३ आमसुल किंवा थोडा चिंचेचा कोळ घालावा. आवश्यकतेनुसार पाणी घालून १ उकळी काढावी.
८) उसळ आणि कट तयार झाला कि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
९) नंतर डिशमध्ये १ डाव उसळ घालावी. त्यावर १ पळी कट घालावा. त्यावर चिवडा, फरसाण, कांदा, टोमॅटो घालावे. लिंबू पिळून तयार मिसळ स्लाईस ब्रेड किंवा पावाबरोबर खावी.

टीप:
१) ओला नारळ उपलब्ध नसेल किसलेला सुका नारळसुद्धा वापरू शकतो.
२) ज्यांना तळलेले बटाटे नको असतील त्यांनी शिजवलेले बटाटे घातले तरी चालते. तळलेले बटाटे उसळीत फुटत नाहीत, शिजलेले बटाटे मिसळीत फुटून मिसळ घट्ट होऊ शकते.

मिसळ.. झणझणीत व तर्रीदार

नाशिकला असतांना सकाळचा नाष्टा म्हणजे "मिसळ..". नाशिकला काही मिसळ प्रसिद्ध आहेत.

१. शामसुंदर: सातपुर MIDC मध्ये हे होटेल आहे. ईथली मिसळ खुप प्रसिद्ध आहे. याची खासीयत आहे मिसळ बरोबर दिला जाणारा पाव, पापड, दही आणी तर्री.
२. अगत्य: पंचवटी कारंजा बस स्टॉप जवळ.
३. कोर्ट कॅन्टीन: जुन्या CBS जवळ आहे. इथे सकाळी १०.३० पर्यंत जायचे म्हणजे मिसळ बरोबर दही व पापड मिळतो. ११.३० ला मिसळ संपते.
४. गार्डन मिसळ: सारडा कन्या शाळे समोर, नेहरु गार्डन जवळ सकाळी ७ ते १० या वेळेत ही गाडी लागते.

नाशिक मध्ये तर्री कितीही घ्या एक्स्ट्रा चार्जेस नसतात.

पुण्यात आल्यापासुन मी मिसळ खाण्याला मुकलो आहे. इथे मिसळची संकल्पनाच वेगळी आहे. मिसळ म्हणजे कधि त्यात का‍दा-पोहे असतात तर कधी मटकी उसळ तर कधी छोले सुद्ध असतात. इथे मिसळ बरोबर तर्री मिळतच नाही. त्याऐवजी ईथे "सॅंपल" देतात. तर्री म्हणजे झणझणीत तिखट रस्सा. पण ईथले सॅंपल म्हणजे फ़क्त रंगाने लाल असणारा, तिखट वाटणारा रस्सा.

पुण्यात मिसळ बरोबर ब्रेड चे स्लाईस देतात. त्यात लादी पावाची मजा येत नाही.

पुण्यात मिळण्याची ठिकाणे:

१. श्रीकृष्ण भुवन: तुळशीबागेच्या शेजारच्या गल्लीत.
२. बेडेकर: शनिवार पेठ. शगुन चौकातुन रमणबागेकडे जातांना डावीकडे एका बोळात आहे. ईथे तुम्हाल पुणेरी पाहुणचाराचा मस्त अनुभव सुद्धा घेता येइल :))
३. लज्जत: सदाशिव पेठ. SPकडुन अलका टॅकीजकडे जातांना टिळक स्मारक चौकात उजवीकडे वळायचे. पुढे तिसर्‍या चौकात उजवीकडे शनिपार बसस्टॉप जवळ.
४. श्री उपहार गृह: रमेश डाईंग जवळ, शनीपार.
५. रामनाथ: साहित्य परिषद जवळ, टिळक रोड.

पुण्याहुन जवळच राजगुरुनगर व नारायणगावला मिसळ मस्त मिळते, झणझणाझणित, काळ्या मसाल्यातली. कधी राजगुरुनगर कींवा नारायणगाव मार्गे जाणार असाल तर तिथली मिसळ आवर्जुन खा...
नाशिककडे जातांना नारायणगाव ओलांडल्यावर डावीकडे एक छोटे होटेल लागते. ऎका मोठया हॉटेलच्या कोपर्‍यावर हे हॉटेल आहे. इथे कोल्हापुरी मिसळ व कडी-वडे खुप छान मिळतात.